Pune News : जाहिरातबाजीवर 160 कोटींची खैरात, कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर – भाजपचे वासुदेव काळे यांची ठाकरे सरकारवर टीका

एमपीसी न्यूज – शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळासारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच 160 कोटींची उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली. त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर 160 कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी दीडशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती.

प्रत्यक्षात मात्र, वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले जात आहे. पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना या फसवणुकीचा फटका बसत असताना ठाकरे सरकार मात्र, पाहणी दौऱ्याच्या नावाखाली मर्सिडीझमधून पर्यटन करण्यात दंग आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

त्यावर कोणतीच कार्यवाही तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटामुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्रातील सर्वांत लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार आहे, अशी टीका काळे यांनी केली आहे.

खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र रसातळाला चालला असताना कोविडचे कारण सांगत जनतेस घरात डांबून ठेवून स्वतःची कातडी वाचविण्याचे सरकारचे कारस्थान आता उघड झाले आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.