Pune News : बी टी कवडे रोड परिसरातील कॅनलमध्ये सापडला पुरुषाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – हडपसर बी.टी. कवडे रोड परिसरातील कॅनलमध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळून आला. राहुल लेणे (वय.45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृतदेहाच्या अंगावर असलेल्या जखमामुळे लेणे यांचा खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, त्या दृष्टीने तपास सुरु आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल लेणे हे वैद्युवाडी येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याचे समजते. त्यामुळे ते कुटुंबियांपासून वेगळे राहत होते. काही दिवसापुर्वी त्यांना औंध येथील एका व्यसनमुक्त केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून ते धायरी परिसरात वास्तव्यास गेले होते. आर्थिक व्यावहारातून कंपनीतील नोकरीचा नुकताच त्यांनी राजीनामा दिला होता. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह कॅनलमध्ये आढळून आला.

स्थानिक नागरिकांनी याची माहिती हडपसर पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांनी मिळून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो लेणे यांचा असल्याचे समोर आले. मृतदेहावर जखमा असल्यामुळे हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांना संशय आहे. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच लेणे यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.