Pune News : लस नोंदणी सुरु होताच सर्व स्लॉट बुक; वशिलेबाजी होत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – राज्यात लसीचा तुटवडा आहे. अशात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे लसीच्या नोंदणीसाठी वशिलेबाजी होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नोंदणी सुरू होताच पहिल्या एका मिनिटात सर्व स्लॉट बुक असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, ही गंभीर असल्याचे म्हटले आहे.

पुण्यात आज (सोमवारी, दि.10) 117 केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. यासाठी (रविवारी, दि.09) रात्री आठ वाजता नोंदणी सुरू झाली. लसीसाठी नोंदणी बंधनकारक असल्याने नागरिक नोंदणीसाठी प्रतिक्षा करत होते. पण, लस नोंदणीसाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्व स्लॉट बुक असल्याचे दिसून आले. यामुळे सर्व स्तरातून नागरिकांनी संताप व्यक्त केला. आठ वाजता सुरू होणारा स्लॉट बरोबर आठ बुक कसा काय दाखवू शकतो ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याबाबत सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, लस नोंदणीसाठी संकेतस्थळ हॅक केलं जात असल्याच्या देखील बातम्या प्रसारित होत आहेत. यामध्ये आयटी क्षेत्रातील कोडर्स लसीच्या उपलब्ध स्लॉट बाबत आगाऊ सूचना मिळावी यासाठी एक सिस्टीम तयार केली आहे. यातून काहीजणांची आपोआप नोंदणी होत असल्याची ‘न्यूज 18’ या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. 28 एप्रिल रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली तेव्हा कोविन संकेतस्थळ कोलमडून पडल्याचे दिसून आले. मात्र, नंतर अवघ्या क्षणांत सर्व स्लॉट बुक झाल्याचे दिसून आले. एवढ्या वेगात बुकिंग करणं मानवाला शक्य नसल्याचे या बातमीत म्हटले आहे.

लसीसाठी अगाऊ नोंदणी हा बनावट प्रकार असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे. लसीच्या दुसऱ्या डोसाचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप लस मिळत नाही. लसीचा तुटवडा, लस नोंदणीसाठी होत असलेला सावळा गोंधळ यामुळे सामान्य नागरिकांना लस कशी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.