Pune News : आचारसंहितेमुळे विकासकामांना ‘ब्रेक’, माननीयांचे ‘वेट ॲण्ड वॉच’ !

एमपीसी न्यूज – एकीकडे कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून महापालिकेची सर्व विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे. तर दुसरीकडे पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीने अत्यावश्यक बैठका वगळता कुठलेही नवीन धोरणात्मक निर्णय आणि प्रकल्पांच्या कामांची सुरुवात करता येणार नाही. त्यामुळे निधी अभावी नगरसेवक-नगरसेविकांना आणखी एक महिना ‘वेट ॲण्ड वॉच’ अवस्थेत राहावं लागणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.

आचारसंहितेमुळे नोव्हेंबर नगरसेवकांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरणार आहे. महापालिकेच्या वतीने उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील 40 टक्के कामे सुचवावीत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ही कामे सुचविताना लॉकडाउन जाहीर झाला त्या तारखेपर्यंतची अर्थात 25 मार्चपर्यंत केलेली कामेही याच 40 टक्क्यांमध्ये धरण्यात येणार असल्याने अनेक नगरसेवकांना यावर्षी शून्य टक्के निधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बहुतांश नगरसेवकांना शून्य टक्के निधी मिळणार असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. नैराश्यातून संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. अशातच आज आचारसंहिता जाहीर झाल्याने पुन्हा महिनाभर कुठलीच विकासकामे करता येणार नसल्याने नगरसेवकांची अस्वस्थता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.