Pune News : शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणा : राष्ट्रवादीचे आयुक्तांना साकडे

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असून, रुग्णांना ऑक्सिजन बेडस, व्हेंटिलेटर मिळत नाही. : Bring the city's corona crisis under control: NCP Demand to the commissioner

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असून, रुग्णांना ऑक्सिजन बेडस, व्हेंटिलेटर मिळत नाही. हॉस्पिटल भरमसाठ बिले आकारत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे हे संकट आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे जोरदार प्रयत्न करण्यात यावे, असे साकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्त विक्रम कुमार यांना घातले.

पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांच्यासोबत राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक सुनील कांबळे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक सचिन दोडके, योगेश ससाणे, नगरसेविका अश्विनी कदम, सुमन पठारे, लक्ष्मी दुधाने, अश्विनी भागवत, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.

पुणे शहरात मागील 5 महिन्यांपासून संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. विकासकामांचा वेगही कमी झाला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता काही उपाययोजना आखण्याची गरज आहे. शहरातील कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड अभावी जीव गमवावा लागला असल्याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

तसेच पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरण्याच्या मार्गावर असताना शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा डेपो संदर्भात आंदोलन केल्याने त्यांच्यावर इतिहासात प्रथमच पोलीस कारवाई झाली आहे. त्याचबरोबर प्रभागातील विविध प्रलंबित समस्या संदर्भात आयुक्तांना माहिती देण्यात आली.

तर, गेल्या काही दिवसांपासून कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी पुणे महापालिकेतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणारे जम्बो हॉस्पिटलचे काम येत्या 2 – 3 दिवसांत पूर्ण होणार आहे. कचरा डेपो संदर्भात योग्य तो निर्णय लवकरच होणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.