Pune News : अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांकडून स्वागत; विरोधकांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी मांडलेल्या 2021 – 22 या वर्षाच्या अर्थसंकल्पाचे सत्ताधारी भाजपने स्वागत केले, तर विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला.

या अर्थसंकल्पावर भाजपच्या सदस्यांनी आनंद व्यक्त करीत अर्थसंकल्पाचे स्वागत केले. अजय खेडेकर म्हणाले, अभ्यासू आणि वास्तववादी बजेट आहे. 10 रुपये बसमध्ये प्रवास महत्वपूर्ण आहे. त्यामुळे नागरिक स्वतःच्या वाहनाऐवजी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कोरोनाचा काळात पदाधिकारी बरोबरच अधिकाऱ्यांनी मोठे काम केले. त्या सर्वांचे अभिनंदन करतो. त्यांना कोविड योद्धा म्हटले पाहिजे.

या अर्थसंकलपातील अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालय उभारणी महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वसामान्य पुणेकरांना घरे मिळणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आरती कोंढरे म्हणाल्या, कोरोनाचा काळ असतानाही पुणे शहराचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महापौरांनी प्रयत्न केले. ऐतिहासिक महात्मा फुले मंडई, अर्थसंकल्पात तुळशीबागेचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. समाविष्ट गावातील नागरिकांना न्याय दिला आहे. तसेच या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेत बिडी कामगार यांना स्थान मिळावे.

तर हा अर्थसंकल्प वास्तववादी नसून स्वप्नवत आहे. कोरोनामुळे कोट्यवधी रुपये जमा करणे आव्हानात्मक असल्याची टीका राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे, हाजी पठाण, गणेश ढोरे यांनी केली. दरम्यान, दुपारी भाजपाच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, योगेश समेळ, गायत्री खडके यांनी बजेटचे पुन्हा स्वागत केले.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी शून्य बजेट घेतल्याने सर्वांनीच त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. गुरुवारी (दि. 4) सकाळी 11 पर्यंत बजेटवरील चर्चा थांबविण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.