Pune News : MPSCच्या परीक्षा रद्द करा; अन्यथा परीक्षा केंद्रे उध्दवस्त करु – मराठा क्रांती मोर्चा

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे MPSC येत्या ११ ऑक्टोबर व २२ नोव्हेंबर २०२० रोजी अनुक्रमे राजपत्रित व अराजपत्रिक (SIT,PSI,ASO) व इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या जाहिराती व अर्ज भरण्याची प्रक्रिया हि सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती पुर्वीची असून संबंधित अर्जामध्ये SEBC अंतर्गत मराठा समाजाला जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर MPSC मधील SEBC च्या आरक्षणावरील शासनाची भूमिका जाहिर न करताच MPSC च्या परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे. या परीक्षा रद्द करा; अन्यथा परीक्षा केंद्रे उध्दवस्त करु, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा कांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहूल पोकळे, पुणे जिल्हा समन्वयक सतिश काळे, परमेश्वर जाधव, अमोल देशमुख यांनी हा इशारा देण्यात आला.

MPSC च्या परीक्षा देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील मराठा गरीब विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून या स्पर्धा परीक्षा त्यांच्या भवितव्यासाठी मोठी संधी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावरील स्थगितीमुळे मराठा समाजातील तरुण हताश व हतबल झालेला आहे.

एकूणच सध्यपरिस्थिती संभ्रमाची व गोंधळाची झालेली आहे. अशा वातावरणात मराठा आरक्षणाशिवाय परीक्षा घेणे म्हणजे मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासारखे होईल.

त्यामुळे MPSC च्या परीक्षामधील SEBC चे आरक्षण वटहुकूम काढून अबाधित ठेवूनच परीक्षा घेण्यात याव्यात. जोपर्यंत वटहुकूम जारी होत नाही तोपर्यंत MPSC च्या परीक्षा घेण्यात येवू नयेत. मराठा आरक्षणाविना MPSC च्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये; अन्यथा समाज भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत.

येत्या ११ आक्टोबर ला महाराष्ट्रातील एकाही परिक्षा केंद्रावर परीक्षा होऊ दिली जाणार नाही. मराठा समाजाच्या होणाऱ्या या उद्रेकाला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार असेल याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा संघटनेने दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर मराठा कांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहूल पोकळे, पुणे जिल्हा समन्वयक सतिश काळे, परमेश्वर जाधव, अमोल देशमुख यांच्या सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.