Pune News : प्रसिद्ध शिवाजी मार्केट जतन करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड उदासीन

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) -पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध शिवाजी मार्केटला तीन दिवसांपूर्वी पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अंदाजे 25 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. लाखो रुपयांचे नुकसान झाले. या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्ड याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या वास्तूच्या जतन आणि संवर्धनासाठी नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करण्यात आले, पण कॅन्टोन्मेंट बोर्डने त्याला केराची टोपली दाखवली.

ब्रिटिश कालीन छत्रपती शिवाजी मार्केटची वास्तू 135 वर्षे जुनी आहे. या मार्केटमध्ये मासे, चिकन विक्रेते आणि भाजीपाला-फळ विक्रेत्यांचे गाळे आहेत. मंगळवारी (दि. 16) पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अंदाजे 25 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

135 वर्षे जुन्या या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. कचरा, नाले, पाणी, आपात्कालीन व्यवस्था आणि सुशोभीकरण करुन या जीर्ण वास्तूला नवसंजीवनी दिली पाहिजे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्ड याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसून येतं आहे.

प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि अर्बन डिझायनर किरण कलमदाणी म्हणाले, ‘ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे शिवाजी मार्केटचे जतन आणि संवर्धन करण्यासंदर्भात प्रकल्प तयार करून त्यावेळेचे ब्रिगेडियर यांच्या समोर तो सादर करण्यात आला. त्यांना तो आवडला देखील, पण पुढे याबाबत काहीच होऊ शकले नाही. मार्केट पूर्णपणे नष्ट करून याठिकाणी मॉल उभारला जावा याबाबत देखील उलटसुलट चर्चा झाली. मुळात ही ऐतिहासिक वास्तू जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे आणि ते शक्य देखील आहे.’

कलमदाणी पुढे म्हणाले, ‘मार्केटची निगा ज्या पद्धतीने राखली गेली पाहिजे त्या पद्धतीने ती राखली जात नाही. एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये जिथं एवढी वर्दळ असते त्याठिकाणी स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. वास्तूचे जतन करत तिला योग्य नियोजनातून सुबद्ध करता येईल. भविष्यात येणारे अपघात देखील यामुळे टाळता येतील’ असे मत कलमदाणी यांनी नोंदवले.

शिवाजी मार्केट 5 हजार 665 चौरस मीटर परिसरात विस्तारलं आहे. जुलै 1885 मध्ये या मार्केटच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि एका वर्षात म्हणजेच जुलै 1886 मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी यासाठी 1 लाख 24 हजार एवढा खर्च आला होता. या ऐतिहासिक वास्तूला 135 वर्ष पूर्ण झाली आहेत.

याठिकाणी लाईट, स्वच्छतागृह, नाले, पार्किंग यासारख्या सुविधा मरणासन्न अवस्थेत आहेत. मार्केटमध्ये मांस आणि भाजीपाला यांची विक्री होते. त्यामुळे रक्त, मासांचे तुकडे, खराब झालेला भाजीपाला याच ठिकाणी अस्तव्यस्त पडलेला असतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरते.

प्रसिद्ध महात्मा फुले मंडईचा देखील पुनर्विकास केला जात आहे. या ठिकाणी भाजी मंडईची क्षमता वाढविणे, व्यावसायिक गाळ्यांची संख्या वाढविणे, पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे अशा पद्धतीने पुनर्विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर शिवाजी मार्केटचा देखील पुनर्विकास शक्य आहे. तीन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा शिवाजी मार्केटच्या सुरक्षा, स्वच्छता आणि इतर बाबींचा विचार समोर आला आहे.

दरम्यान, 135 वर्षे जुन्या या ऐतिहासिक वास्तूला जतन करण्याच्या दृष्टीकोनातून पुणे छावणी परिषदने सकारात्मक विचार केला पाहिजे. या मार्केटला नवसंजीवनी दिली तर, तिचं ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून भविष्यातील दुर्घेटना देखील टाळता येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.