Pune News : विविध कार्यक्रमांद्वारे पोलीस वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज: वैद्यकिय शिबीर, शस्त्र प्रदर्शन,‘फायर सिलेंडर प्रात्यक्षिक, आयुर्वेदिक औषधे घरच्या घरी कशी बनवावी याबाबत मार्गदर्शन, कोरोनाबाबत जनजागृती आदी विविध कार्यक्रमांद्वारे पोलीस स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त 2 ते 8 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्य राखीव पोलीस दलाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजयकुमार बाविस्कर आणि गट क्रमांक दोनचे समादेशक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले.

राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरता कोरोना आजाराबाबत गटरुग्णालय येथे वैद्यकिय शिबीर आयोजित करण्यात आले होते. डॉ. निकम यांनी आजाराबाबत माहिती देऊन उपाययोजना व त्याबद्द्ल मार्गदर्शन केले. या शिबीराचा एकूण 69 पोलीस अंमलदारांनी लाभ घेतला.

गटातील पोलीस पाल्यांकरता समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2, पुणे येथील कवायत मैदानावर ‘शस्त्र प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते. गटातील रिझर्व्ह कंपनी करता ‘फायर सिलेंडर प्रात्यक्षिक’ आयोजित करून आग लागल्यास तातडीने काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल अतुल खोपडे यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.

गटातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या महिला कुटुंबियांकरता अलंकारण हॉल येथे ‘माझे स्वयंपाकघर, माझे आरोग्य मंदीर’ या विषयांवर डॉ. विद्याधर चव्हाण (व्याधी मुक्त कुटुंबाचे जनक) व त्यांचे सहकारी यांनी आयुर्वेदिक औषधे घरच्या घरी कशी बनवावी, याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित महिलांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.

गटपरिसरात व गटाच्या मुख्य ठिकाणी कोरोना च्या अनुषंगाने, मास्क व्यवस्थित लावणे, दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फूटांचे अंतर असावे, हात साबण व पाण्याने धुणे याबाबतचे बॅनर लावण्यात आले होते. जलद प्रतिसाद पथक (क्युटी) यांच्यामार्फत सर्व पोलीस वसाहतींमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.