Pune News: केंद्रीय सीमाशुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई, तब्बल 412 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करण्याचा डाव केंद्रीय सीमाशुल्क च्या पुणे विभागाने हाणून पाडला. सीमा शुल्क विभागाने नळदुर्ग ते सोलापूर महामार्गावर रविवारी कारवाई करत 65 लाख रूपये किमतीचा तब्बल 412 किलो गांजा जप्त केला. सीमा शुल्क विभागाची मागील दोन महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

केंद्रीय सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नळदुर्ग ते सोलापूर या मार्गावर रविवारी नाकाबंदी केली होती. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात होती. तपासणीदरम्यान वाहनांची मोठी रांग लागली होती. ही नाकाबंदी सुरू असतानाच तेथून काही अंतरावर एक ट्रक चालक ट्रक चालू अवस्थेत घेऊन पसार झाला असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

या ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या केबिनवर पोकळी आढळली. या पोकळीतील प्लास्टिकच्या 206 बॉक्समध्ये तब्बल 412 किलो गांजा लपवला होता. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने ट्रक आणि गांजा असा एकूण 85 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.