Pune News : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकार कडून हिरवा कंदील

एमपीसी न्यूज – महापालिकेतर्फे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी बाबुराव सणस शाळा आणि कमला नेहरू रुग्णालयामध्ये सर्व यंत्रणा उभारण्यात येत आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्राकडे महापालिकेने प्रस्तावही पाठवला होता त्याला केंद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनने गुरुवारी मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते.

अखेर याला यश आले असून लवकरच महाविद्यालय सुरु होणार आहे. पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला आज नॅशनल मेडिकल कमिशनने परवानगी दिली. यामुळे यावर्षी डिसेंबर पासून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची नियुक्ती करण्यात आली असून टीचिंग स्टाफच्या मुलाखती झाल्या आहेत. अन्य स्टाफची लवकरच भरती होईल.

सध्या सणस शाळेत वर्ग व कमला नेहरू रुग्णालयात प्रात्यक्षिकाची सोय करण्यात आली आहे. लवकरच नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारून रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ आणि विक्रम कुमार यांनी दिली.

महापालिकेचे हे पहिलेच मेडिकल कॉलेज व रुग्णालय आहे. हे कॉलेज अहमदाबादच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालच्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून महापालिकेचे पदाधिकारी व गटनेते या ट्रस्टमध्ये असणार आहे. कॉलेज चालवण्याचा सगळा खर्च कमीत कमी होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. हे कॉलेज चालवण्यासाठी साधरण दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.