Pune Metro News : भुयारी मेट्रो मार्गातील आव्हानात्मक टप्पा पूर्ण

एमपीसी न्यूज – महामेट्रोतर्फे सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गातील आव्हानात्मक टप्पा सोमवारी पूर्ण झाला आहे. त्यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.

कृषी महाविद्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. टनेल बोरिंग मशिनद्वारे १० महिन्यात १ हजार ६०० मीटरच्या बोगद्याचे काम महामेट्रोकडून पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच नदीपात्राखालून बोगद्यासाठी खोदाईचा टप्पा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गातील ५ किलोमीटर लांबीचा मार्ग हा भुयारी आहे. 2019 नोव्हेंबर महिन्यापासून भुयारी मार्गाच्या कामाला प्रारंभ झाला. भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी प्रस्तावित स्थानकांच्या ठिकाणी मोठा शाफ्ट करून त्याखाली बांधकाम करण्यात येते.

भुयारी मार्गाचे काम टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने सुरू आहे. त्यासाठी चीन येथून ही मशीन आणण्यात आली आहेत. यावेळी मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, टाटा प्रोजेक्ट कंपनीचे राजेश जैन व बेनी जोसेफ, मेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे उपस्थित होते. भुयारी मार्गाचे आव्हानात्मक काम पूर्ण झाल्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.