Pune News: ‘पौड फाटा येथील उड्डाण पूल संकल्पनेचे श्रेय चंद्रकांत पाटील यांनी घेऊ नये’

Pune News: 'Chandrakant Patil should not take credit for flyover concept at Paud Fata' रस्ता, पुल वा महत्त्वाच्या ठिकाणी लावले जाणारे नामफलक, दिशादर्शक फलकांवर अशाप्रकारे स्वतःचे नाव लावणे हे बंद करावे, अशी मागणी निकम यांनी केली आहे.

एमपीसी न्यूज- पौड फाटा येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उड्डाण पुलाच्याखाली नव्याने बसवलेल्या नामफलकावर संकल्पना म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव टाकण्यात आले आहे. त्या संकल्पना नावाचा उल्लेख काढावा, अशी मागणी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष नीलेश निकम यांनी केली आहे.

पालिकेच्यावतीने कोथरुडमधील पहिला उड्डाणपुल दशभुजा गणपती येथे बांधण्यात आला. या पुलाचे काम 1996 साली सुरु झाले. त्यावेळी या पुलाचे नामकरण स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर असे करण्यात आले. आता या पुलाच्याखाली नव्याने जो नामफलक बसवण्यात आला आहे. त्यावर संकल्पना म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर खासदार गिरीश बापट, नगरसेविका छाया मारणे यांचे नाव या फलकावर आहे.

फलक लावण्याची संकल्पना चंद्रकांत पाटील यांची असेल, पण पुल उभारण्याची नव्हे. त्यामुळे फलकावर या बाबी पण स्पष्ट केल्या असत्या तर बरे झाले असते. अशा प्रकारे नागरिकांच्या खर्चातून फलक लावले जाऊ नयेत, असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

रस्ता, पुल वा महत्त्वाच्या ठिकाणी लावले जाणारे नामफलक, दिशादर्शक फलकांवर अशाप्रकारे स्वतःचे नाव लावणे हे बंद करावे, अशी मागणी निकम यांनी केली आहे.

पूर्वीपासूनच स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल असे नाव असलेल्या या पुलाचे श्रेय घेण्यासाठी चाललेली ही धडपड अनाकलनीय आहे. म्हणजे स्वतः नवीन काही निर्माण करायचं नाहीच. पण इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणे चुकीचे आहे, असे निकम यांनी म्हटले आहे.

सात दिवसांत हा फलक काढला नाही, तर महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या माध्यमातून तो काढण्यात येईल व त्यामध्ये कुठल्या प्रकारचा वाद विवाद निर्माण झाला त्याची संपूर्ण जबाबदारी महापौर व पुणे महानगरपालिका आयुक्त यांची राहिल असे या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी, महापौर, पालिका आयुक्त यांना हे निवेदन पाठविण्यात आले असून कोथरूड पोलीस ठाण्याला एक प्रत देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.