Pune News : सनदी लेखपालांनी औद्योगिक प्रशिक्षण घ्यावे- सीए निहार जांबूसरिया

एमपीसी न्यूज : उद्योगाला उभारी देण्यासाठी सनदी लेखापाल सल्लागार म्हणून काम करत असतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला पूरक असे प्रशिक्षण सनदी लेखापालांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून तशा संशोधनाला प्रोत्साहन देत आहोत. मागील 8-9 महिन्यात आलेल्या आव्हानांतून व्यावसायिकांना, उद्योगाला बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण त्यासाठी पुढाकार घेऊन काम करावे,” असे प्रतिपादन दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) उपाध्यक्ष सीए निहार जांबूसरिया यांनी केले.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाच्या कमिटी फॉर मेंबर्स इन इंडस्ट्री ॲड बिझनेसच्या वतीने ‘सीएफओ- सीईओ’ संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट इथे पार पडला.

यावेळेस ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए निहार जांबूसरिया, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘सीएमआयबी’चे चेअरमन सीए राजेश शर्मा, सीए हंस राज चुग, सीए अभिषेक झावरे, ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.

या चर्चासत्रात डॉ. हरप्रीत सिंग यांनी आरोग्य, प्रमोद घोरपडे यांनी औषधनिर्माण तर सीए सुहास कड्लस्कर, अनिल पटवर्धन, संदीप बात्रा यांनी अनुक्रमे ॲटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रातील 1200 पेक्षा जास्त मुख्य वित्तिय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. नवीन बदल, तंत्रज्ञान आणि सध्याच्या वातावरणामुळे आलेली आव्हाने याविषयी चंद्रशेखर चितळे यांनी मार्गदर्शन केले.

सहकारी बॅंका चांगले काम करत आहेत. या क्षेत्रात देशात व परदेशात सीएंना मोठ्या संधी आहेत. आयसीएआयकडून त्यासाठी पावले उचलली जात आहेत. व्यावसायिक व्यवस्थापनाला आज सगळेच प्राधान्य देत आहेत. उद्योग क्षेत्रात असलेल्या या संधीकडे बघून आपण तशी कौशल्ये आत्मसात करावी, असे सीए चंद्रशेखर चितळे यांनी संगितले.

देशाच्या आर्थिक विकासात सनदी लेखापालांची भूमिका महत्वाची असून आपले दायित्व ओळखून आपण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी प्रामाणिक मेहनत घ्यावी. कोरोनाच्या संकटकाळातही सनदी लेखपालांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे, सीए राजेश शर्मा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.