Pune News : औंध येथील ब्रेमन चौकात ‘चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क’

एमपीसी न्यूज : लहानपणापासून मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती, नियमांचे पालन करण्याची सवय लागावी याकरीता पुणे महापालिकेच्या वतीने औंध येथील ब्रेमन चौकात चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क (वाहतूक उद्यान) साकारण्यात आले आहे. या पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून औपचारीक उद्घाटन केले जाणार आहे.

वाहतुकीचे विविध नियम काय आहेत, नियमांची चिन्हे, त्या चिन्हांचा उपयोग, अर्थ काय, वाहने कशी व कुठे उभी करावीत अशा विविध प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना होण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने या ठिकाणी चिल्ड्रेन्स ट्रॅफीक पार्क साकारले आहे.

लहान मुलांना सोप्या पद्धतीने नियम कळतील अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या भागात पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील दुहेरी मार्गिका, सायकल मार्ग, पार्किंग व्यवस्था, चौक, स्वतंत्र सिग्नल, पादचारी क्रॉसिंग, तर दुसर्‍या भागात वाहतूक सुरक्षेसंदर्भातील माहिती चिन्हे, मराठी-इंग्रजीमध्ये माहिती, वाहतुकीसंबंधी 2 ते 3 मिनिटांचा माहितीपट आदींचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

पार्कचे काम दोन ते चार दिवसात पूर्ण करून त्यांचे लवकरच लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे पथविभागाचे कार्यकारी अभियंते दिनकर गोजारे यांनी सांगितले आहे. पार्कमध्ये 12 वर्षापर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जाणार असून त्यांच्यासाठी 27 सायकली व हेल्मेटची व्यवस्था असणार आहे. शुल्क आकारून मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. याठिकाणी लहान मुले आणि त्यांच्या बरोबर आलेले पालक किंवा शिक्षक यांना माहिती देण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली जाणार आहे. या उपक्रमामधून मुलांमध्ये लहान वयातच वाहतूक विषयांबाबत जनजागृती होईल, असा विश्वास पुणे महापालिकेला वाटतो.

पार्कमध्ये नेमके काय काय असेल….

– ‘छोटा भीम’च्या रूपातील वाहतूक पोलिसाचे शिल्प करणार स्वागत
– वाहतूक चिन्हांचे फलक, विद्युत खांब, सिग्नल याची हुबेहुब प्रतिकृती
– वाहन परवाना समजावा यासाठी 4 फुटी प्रतिकृती
– मुलांसाठी चार प्रकारच्या सायकली व हेल्मेट
– दिव्यांगांनाही करता खास सुविधा
– आकर्षक बैठक व्यवस्था

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.