Pune News : संजय जाधव यांच्या ‘फिल्मॅजिक’च्या उद्घाटनाला लोटली सिनेसृष्टी

एमपीसी न्यूज – संजय जाधव यांच्या ‘फिल्मॅजिक’ या फिल्म स्कुलचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. कोरोनानंतर पहिल्यांदाच दिग्गज मराठी कलाकार एकत्र आले होते.

फिल्म स्कुलच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, मानसी साळवी, सोनाली खरे, अभिनेता स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, उमेश कामत, सिध्दार्थ जाधव, संजय नार्वेकर ह्या सुपरस्टार्ससोबतच नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघन, फिल्ममेकर विजु माने, अभिजीत पानसे, केदार शिंदे आदी कलाकार उपस्थित होते.

सचिन पिळगावकर म्हणाले, संजयची वाटचाल मी खूप अगोदरपासून पाहत आलोय. त्याने अतिशय मेहनतीनं आपलं करीयर घडवलंय. त्याचं नेतृत्व फिल्मॅजिक स्कुलच्या विद्यर्थ्यांचं करीयर घडवायला नक्कीच उपयोगी पडेल.

फिल्मॅजिकच्या स्थापनेविषयी संजय जाधव म्हणाले, सिनेमाच्या मुख्य धारेत समाविष्ट होताना फिल्मसेटवर वापरली जाणारी भाषा, वावरायची पध्दत अशा अनेक गोष्टी नवोदिताला शिकाव्या लागतात. सिनेसृष्टीत पाऊल ठेवताना इथला माहौल पाहून अनेकांना भांबावायला होतं. मी स्वानुभवाने शिकत गेलो.

नव्या पिढीला आत्मविश्वासाने आपली वाटचाल करता यावी, म्हणून माझ्या आणि सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या तंत्रज्ञांच्या अनुभवाची शिदोरी आम्ही फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. फिल्मॅजिक फिल्म स्कुलमध्ये प्रवेशासाठी कोणत्याही वयाची, शैक्षणिक पात्रतेची किंवा भाषेची बंधन नसल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.