Pune News: वाढीव पार्किंग शुल्कावरून मार्केटयार्ड बंदचा इशारा

एमपीसी  न्यूज: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीसाठी येणाऱ्या तीन चाकी वाहनांसाठी पन्नास रुपये तर चारचाकी वाहनासाठी शंभर रुपये पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बाजारातील अडते, टेम्पो संघटना, खरेदीदार आणि कामगार संघटनांनी विरोध केला आहे. येत्या शुक्रवार पर्यंत हा निर्णय रद्द न केल्यास रविवार पासून मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय सर्व घटकांनी घेतला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या समवेत विविध संघटना, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील किरकोळ खरेदीदारांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पार्किंग शुल्क आकारणी बाबत चर्चा झाली. मात्र ठोस निर्णय न झाल्याने रविवार पासून मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी दररोज फळे आणि भाजीपाला भागातून एक हजार ते पंधराशे गाड्यांमधून शेतमालाची आवक होते. हा माळ खरेदी करण्यासाठी शहर आणि उपनगर परिसरातून तीन ते चार हजार वाहने दररोज मार्केट यार्डात येतात. दरम्यान याठिकाणी येणाऱ्या तीन आणि चार चाकी वाहनांकडून 100 आणि 250 रुपये कसलीही पावती न देता पार्किंग आणि वरईच्या नावावत वसूल करत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आले आहे. ही प्रथा मोडीत काढण्यासाठी वाढीव शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.