Pune News : ‘बंद घर, वीजवापर होत नसला तरी थकबाकी भरा’ – महावितरण

एमपीसी न्यूज – वीजपुरवठा खंडित केल्यानंतर घरात कोणी राहत नाही किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे वीजवापर नसला तरी बिलांची थकबाकी ठेऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकबाकी पोटी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पुणे परिमंडलातील 95 हजार 127 थकबाकीदार ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून शुकवार (दि. 24) पर्यंत अंधारातच आहेत. यामध्ये सर्वाधिक 76 हजार 13 घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.

ग्राहकांनी कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईनद्वारे थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यास वीज पुरवठा सुरु करण्यात येईल. मात्र कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सहा महिन्यांमध्ये व्याज, दंड आणि संपूर्ण थकबाकी न भरल्यास नंतर नवीन वीजजोडणी घ्यावी लागणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी वीजवापर नसल्यास किंवा घर बंद असले सध्याची थकबाकी व पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करावा,  असे आवाहन महावितरणने केले आहे

महावितरणकडून सध्या शून्य ते 30 युनिट वीजवापर होणाऱ्या वीजजोडण्यांची तपासणी वेगाने सुरु आहे. तसेच वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्यांच्या पर्यवेक्षणासाठी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसा व सायंकाळनंतर विशेष तपासणी सुरु आहे. या दोन्ही मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आजूबाजूच्या ठिकाणाहून केबलद्वारे अनधिकृत वीजवापर आढळल्यास केल्यास नियमाप्रमाणे कलम 126, 135, किंवा 138 नुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच पुण्याबाहेरून ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घर बंद असणे, भाडेकरू नसल्याने घर बंद किंवा इतर कारणांमुळे वीजवापर नसल्याने थकबाकी भरलेली नसल्याचे दिसून येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

सद्यस्थितीत घरगुती वर्गवारीमध्ये (कंसात थकबाकी) पुणे शहरात 35 हजार 885 (31.57 कोटी), पिंपरी चिंचवड शहरात 13 हजार 308 (14.42 कोटी) तसेच हवेली ग्रामीणसह मुळशी, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, खेड व मावळ तालुक्यामधील 26 हजार 852 ग्राहकांचा (24.94 कोटी) वीजपुरवठा खंडित आहे. ग्राहकांनी थकीत वीजबिल व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा सुरु करण्यात येईल असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.