Pune News : पूजा चव्हाण आत्महत्येची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी : चंद्रकांत पाटील  

एमपीसी न्यूज : पूजा चव्हाण आत्महत्येमागे महविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे पोलिसांमार्फत चौकशी करून सत्य बाहेर काढावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पुन्हा केली.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाच्या पाहणी नंतर पाटील म्हणाले, पुण्यात पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येमागे एक मंत्री आहे. मोबाईलवरून हे स्पष्ट झाले आहे, लॅपटॉप स्कॅन केले तर आणखी पुरावे येतील. दोघे जण तिच्या पाळतीवर होते.

दुसरा एक मंत्री दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवतो. तिच्यापासून दोन अपत्ये असल्याची जाहीर कबुली देतो तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महिला सुरक्षितेवर बोलत होते. त्यांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरे यांनी या आत्महत्येची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडीतील ‘त्या’ मंत्र्याचे तुम्ही नाव का घेत नाही, या प्रश्नावर त्यांनी संबंधित मंत्र्याचे नाव घेणे टाळले.

तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे का, या प्रश्नावर पाटील म्हणाले, पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद नसून कोणाच्यातरी दबावाखाली ते काम करत आहे. त्यांचा काही दोष नाही असे सांगत पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.