Pune News : आयुक्त व पालिका अधिकाऱ्यांनी दुचाकीवरुन शहरभर फेरी मारावी, म्हणजे नागरिकांच्या त्रासाची कल्पना येईल – संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज – सर्वप्रथम आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी दुचाकीवरुन शहरभर फेरी मारावी व खोदाईच्या कामाची व रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करावी म्हणजे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना येईल. तसेच शहरातील एकूणच खोदाईच्या कामाचे ऑडिट करावे. याद्वारे एकूण खोदाईला दिलेल्या परवानग्या, प्रत्यक्षात झालेली खोदाई व नियमांचे पालन झाले का हे ही प्रशासनाच्या लक्षात येईल, अशी विनंती क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे शहरात सर्वत्र खोदाईची कामे चालू आहेत. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट, लॉकडाउन, अवकाळी पाऊस व कामगारांची वानवा या परिस्थितीत मनपाच्या अनेक विकासकामांना विलंब झाला हे मान्य केले. तरी या कामात अनेक प्रशासकीय चुका देखील निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी एकदा शहराची दुचाकरीवरून पाहणी करावी. आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा.

खोदाई करताना अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या तोडल्या गेल्याने घरीच असणाऱ्या व घरून काम करणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी महावितरण, बी एस एन एल तर कुठे पाण्याच्या लाईन तोडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अज्ञात कारणामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी अद्याप ही ह्या वाहिन्या दुरुस्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाच्या प्रति प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे त्यांनी निवेदनातून नमूद केले आहे. अनेक रस्ते केबल कंपनी, महावितरण, एल अँड टी यांनी खणून अनेक दिवस झाले. मात्र अद्याप रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. त्याची कालमर्यादा काय ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.