Pune News : काँग्रेसने दिलेले योगदान नव्‍या पिढीपर्यंत पोचविणे आवश्यक – रमेश बागवे

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि काँग्रेसने दिलेले योगदान नव्‍या पिढीपर्यंत पोचविणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15 ऑगस्टला सकाळी दहा वाजता पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी रमेश बागवे बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व काँग्रेसचा इतिहास हा एकच आहे. स्वातंत्र्याचा लढा हा लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद आदी थोर स्वातंत्र्य सेनानींच्या नेतृत्वाखाली लढला गेला. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईच्या तेजपाल सभागृहामध्ये झाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष इंग्रज सरकारविरोधात लढला. सुरूवातीच्या काळात लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळकृष्ण आगरकर, न्या. महादेव रानडे, लाला लजपतराय, मोतीलाल नेहरू यांनी आंदोलने केली. ‘‘

ते म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळक यांनी दैनिक केसरीच्या माध्यमातून अनेक विषयांवर इंग्रज सरकारविरोधात टिका केली होती. महात्मा गांधींनी असहकार चळवळ, सविनय भंग चळवळ, मिठाचा सत्याग्रह, चंपारण्य सत्यागृह, बारडोली सत्याग्रहाच्या मार्फत ब्रिटीश सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध केला. त्यांच्या आंदोलनामध्ये देशातील सर्व जाती जमातीचे लोक सहभागी व्‍हायचे. 8 ऑगस्ट 1942 ला काँग्रेस पक्षाचे अधिवेशन मुंबईत झाले. त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला चले जावचा नारा दिला. त्याच दिवशी रात्री महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद व इतर नेत्यांना इंग्रज सरकारने अटक केली. 9 ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टँक येथे अरूणा असफ अली आणि सत्याग्रहींनी तिरंगा झेंडा फडकविला. ‘‘

ते म्हणाले, ‘‘पोलिसांनी सत्याग्रहींवर लाठी हल्ला व गोळीबार केला. अनेक सत्यागृही मृत्यूमुखी पडले. 1942 च्या आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईला एक नवीन दिशा दिली. इंग्रज सरकारला संपूर्ण भारतातून विरोध होऊ लागला. 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रज सरकारने देशाची सत्ता भारताकडे सुपूर्त केली. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते, क्रांतिकारी, लाखो सत्याग्रहिंना तुरूंगवास भोगावा लागला. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ‘‘

ते म्हणाले, ‘‘देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक धाडसी पाऊल उचलले. भाक्रा नांगल धरण, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, पुण्यातील NDA, हिंदुस्थान ॲन्टीबॉटिक्स, हिंदुस्थान ॲरॉनोटिक्स सारखे कारखाने स्थापन केले. IIT, IIM, सारख्या संस्था स्थापन करून देशाला आधुनिकीकरण कडे नेले. त्यानंतरचे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्‍ही. नरसिंहराव व डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला प्रगत देश बनविले. हे फक्त काँग्रेसच्या पुरोगामी विचारामुळेच शक्य झाले. ‘‘

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.