Pune News : महापालिका विषय समिती निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या रखडलेल्या विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले आहेत. हे तिन्ही पक्ष भाजपच्या उमेदवारांना आव्हान देणार आहेत.

शहर सुधारणा समिती अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश ढोरे, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका चांदबी नदाफ, क्रीडा समिती अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अविनाश बागवे, उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे वनराज आंदेकर, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतर्फे हमीदा सुंडके, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट, विधी समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या संगिता ठोसर, उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या अश्विनी भागवत यांनी आज अर्ज दाखल केला.

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल उपस्थित होते.

या विषय समित्यांची निवडणूक दि. 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

कोरोनाच्या संकटामुळे या विषय समित्यांची निवडणूक लांबली होती. ही निवडणूक घेण्यासाठी महापालिकेतर्फे राज्य शासनाला विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने ही निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे.

या निवडणुकीसाठी समाजकल्याण आयुक्त प्रशांत ननावरे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रत्यक्ष मतदान पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे या विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी पुणे महापालिकेत हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

आगामी पुणे महापालिकेची निवडणूक सुद्धा हे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.