Pune News : काँग्रेस पक्षातर्फे पदवीधर, शिक्षकांच्या मेळाव्यात विजयाचा निर्धार !

एमपीसी न्यूज : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आज, गुरुवारी व्यक्त करण्यात आला.

महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी मेळाव्याचे संयोजन केले होते. शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.जयंत आसगावकर तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल, प्रा.अविनाश ताकवले आदी उपस्थित होते.

आघाडीतील घटक पक्ष एकजुटीने प्रचार करीत असल्याने पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण गणपती लाड, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर विजयी होतील, असा विश्वास सर्व नेत्यांनी भाषणात व्यक्त केला.

तसेच पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांचीच नावे मतदार यादीत नाहीत, यातून दोघांची मतदानाबद्दलची अनास्था दिसून येते, अशीही टीका यावेळी वक्त्यांनी केली.

यावेळी आबा बागुल यांनी शिक्षकांसाठी घरकुल योजना,बालवाडी शिक्षक व सेविकांसाठी कायम करण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

पुणे विभागातून दोनवेळा भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले परंतु, त्यांनी पदवीधर व शिक्षकांच्या समस्यांवर कोणतेही लक्ष दिले नाही. एक तारखेला मतदान असून आपण आपली एक नंबरची पसंती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देऊन निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.