Pune News : पुणेकरांच्या पैशाची लूट होत आहे त्यावर काँग्रेसने भुमिका स्पष्ट करावी : माजी गटनेता अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून चुकीच्या विषयांना मंजुरी देत सुटले आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस पक्ष मात्र नगरसेवकांची साधी बैठकही बोलावत नाही. पुणेकरांच्या पैशाची लूट होत असताना काँग्रेस पक्षाने विषयांवर आपली भुमिका स्पष्ट करावी, अशी अजब मागणी शहराध्यक्षांकडे काँग्रेसचे नगरसेवक माजी गटनेता अरविंद शिंदे यांनी केली आहे.

नगरसेवक शिंदे यांनी यासंदर्भात काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये कॅश क्रेडिट बाँडच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावरील 12 रस्ते आणि 2 उड्डाणपुलांसाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव हा फक्त ठराविक बांधकाम व्यावसायिकांसाठी आहे. यामधून जनतेच्या पैशाची लूट केवळ या व्यावसायिकासाठी केली जाणार आहे.

शहरातील ठराविक 6 मी. चे रस्ते 9 मी. करण्याचा घाटही हा ठराविक भागातील व्यवसायिकांसाठीच घालण्यात आला आहे. तातडीचा विषय म्हणून विनानिविदा कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आले आहे. यातून केवळ पैसा मिळवून आगामी महापालिका निवडणूक लढवणे हा भाजपचा उद्देश आहे.

यासंदर्भात मी सातत्याने आवाज उठवायचा प्रयत्न करत आहे. परंतु यासाठी साधी पक्षाच्या नगरसेवकांची बैठकही बोलावली जात नाही. एक वर्षाने निवडणूक होणार आहे. पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी थांबवण्याबाबत ‘काँग्रेस’ ची भुमिका काय आहे ? असा सवालच अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला आहे. या ठिणगीमुळे येत्या काळात काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि अंतर्गत धूसफुस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.