Pune News : कोट्यवधी खर्चून जायका प्रकल्पावर सल्लागाराची होणार नेमणूक !

एमपीसी न्यूज : एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक टंचाई तर दुसरीकडे कोट्यवधींची उधळपट्टी, असा भोंगळ कारभार पुणे महापालिकेत उघडकीस आला आहे. जायका प्रकल्पाच्या कामावर देखरेख करण्यासाठी नव्याने सल्लागार एजन्सी नेमून त्यावर कोट्यवधी रूपये खर्च करण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू आहेत.

महापालिका, जलशक्ती मंत्रालय आणि जायकाचे अधिकारी यांची गेल्या महिन्यात एकत्रित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. या बैठकीमध्ये या प्रकल्पाचे कामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती करण्यास मान्यता देण्याची विनंती महापालिकेने केली असल्याचे समोर आले आहे.

वास्तविक पाहता महापालिकेने जायका आणि जलशक्ती मंत्रालयाबरोबर केलेल्या करारात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी “स्वतंत्र आणि पूर्णवेळ अंमलबावणी कक्ष स्थापन करू’ असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार कक्षासाठी कागदोपत्री 20 अभियंत्यांची नियुक्ती केली असल्याचे महापालिकेने जलशक्ती मंत्रालय व जायका कळविले देखील आहे.

_MPC_DIR_MPU_II

असे असताना नव्याने पुन्हा प्रकल्पावर देखरेखीसाठी स्वतंत्र सल्लागार एजन्सी नेमण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

वास्तविक निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किमान एक वर्षाचा कालवधी आणि ते पूर्ण होण्यासाठी आणखी किमान तीन वर्षांचा कालवधी लागण्याची शक्‍यता आहे. तरी या एजन्सीला किमान 10 ते 15 कोटी रूपये केवळ देखरेखीपोटी मोजावे लागणार आहेत.

महापालिकेकडे सुमारे 600 अभियंते आहेत. त्यांच्या माध्यमातून ही या प्रकल्पाच्या कामावर देखरेख होऊ शकते. असे असताना स्वतंत्र सल्लागार एजन्सीवर कोट्यवधी रूपये उधळण्यामागे कारण काय. कोणासाठी ही स्वतंत्र एजन्सी नेमली जात आहे, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

यावर स्पष्टीकरण करताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, जायका प्रकल्पाच्या कामावर देखरेख करण्यासाठी सल्लागार एजन्सी नेमण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती जलशक्ती मंत्रालय आणि जायकाला केली आहे. त्यांची गरज देखील आहे. त्यामुळे ही एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.