Pune News: खराब फिरते हौद पुरविणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार- आयुक्त

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या 30 फिरत्या हौदांपैकी कुठेही कचऱ्याच्या कंटेनरचा वापर केलेला नाही. पण, खराब अवस्थेतील हौद पुरविल्यामुळे संबंधित ठेकेदारास तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरत्या हौदांकरिता कचऱ्याच्या कंटेनरचा वापर केल्याच्या आरोपांचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरते हौद चांगल्या दर्जाचे पाहिजे होते. मात्र, अत्यंत निकृष्ठ दर्जाचे ते वापरले गेल्याचा आरोप बाळा ओसवाल यांनी केला. या हौदांसाठी कचऱ्याच्या कंटनेरचा वापर केला नाही. या हौदांची स्थिती खराब होती, हे वास्तव आहे. हौद पुरविणाऱ्या  ठेकेदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. मात्र, यंदा कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट पुणे शहरात निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.