Pune News : कोरोना आर्थिक टंचाईमुळे बहुतांश नगरसेवकांना ‘शून्य रुपये’ विकासनिधी !

एमपीसी न्यूज : महापालिका प्रशासन कोरोनासह आर्थिक टंचाईविरोधात पण लढत आहेत. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्यामुळे अनेक विकासकामांच्या निधीला कात्री लागणार आहे. परिणामी यंदाच्या आर्थिक वर्षात ‘शून्य’ रुपयांचा निधी बहुतांश नगरसेवकांच्या वाट्याला येणार आहे.

कोरोनाच्या लढ्यामध्ये जम्बोसह अन्य कोविड केयर सेंटर उभारणीसाठी मोठा खर्च करावा लागल्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक विकासकामांच्या निधीला कात्री लागली आहे. परंतु त्यावर दिलासा म्हणून प्रशासनाने नगरसोवकांना 40 टक्के कामे सुचवा, असे स्पष्ट सांगितले आहे.

मात्र, याच 40 टक्के निधीत 25 मार्च 2020 अखेर केलेल्या कामांचा खर्च धरण्यात येणार असल्याने अनेक नगरसेवकांच्या हाती ‘शून्य रुपयांचा निधी अर्थात भोपळा’ पडणार आहे. यामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांची नाराजी दूर करण्यात पदाधिकार्‍यांची दमछाक होत आहे.

मार्च महिन्यात कोरोनामुळे सलग पाच ते सहा महिने मिळकतकर आणि राज्य सरकारकडून येणार्‍या जीएसटी व्यतिरिक्त अन्य विभागाचे उत्पन्न जवळपास ठप्प झाले. कोरोना विरोधातील उपाययोजनांसाठी जवळपास 300 कोटी रुपये खर्च झाले. सुदैवाने या खर्चाची काही महिन्यांसाठी तोडमिळवणी शक्य झाली आहे.

दरम्यान नगरसेवकांनी प्राधान्यक्रम ठरवून कामांची याद्याही दिल्या आहेत. मात्र, प्रशासनाने 25 मार्चपुर्वी वर्क ऑर्डर दिलेल्या कामांची परंतू आर्थिक अडचणीमुळे अद्याप बिले न दिलेल्या कामांची रक्कमही याच 40 टक्के कामांत धरली आहे.

त्यामुळे मागील वर्षाअखेरीपर्यंत कामे शिल्लक ठेवणार्‍या नगरसेवकांना याचा फटका बसला आहे. प्रशासनाच्या या सूत्रानुसार अनेक नगरसेवकांना चालू वर्षी शून्य रुपये निधी मिळणार आहे.

या संदर्भात स्पष्टीकरण करताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न वाढीसाठी मिळकतकर अभय योजनेसह अन्य योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील 40 टक्के कामे करण्यासाठी ऑक्टोबर अखेर मिळालेल्या उत्पन्नाचा सध्या विचार करण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून अथवा अन्य निधी उपलब्ध झाल्यास पुढील काही महिन्यांत नगरसेवकांनी सुचविलेल्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.