Pune News: पुण्यातील एमआयटीच्या कॅम्पस मधील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज: पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या एमआयटी महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. एकाच वेळी 13 विद्यार्थी पॉझिटिव सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोथरूड परिसरात असलेल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करतच शहरातील शैक्षणिक संस्था सुरू आहेत. दोन्ही लसीचे डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. एम आय टी महाविद्यालयातही नियमांचे पालन करूनच अभियांत्रिकीचे वर्ग सुरू होते.. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले त्या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासन सतर्क झाले असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.