Pune News: कोरोना रूग्णांच्या वाढीव बिलातील आतापर्यंत 25 लाख 69 रूपये केले कमी

गुरूवारी एका दिवसात दाखल झालेल्या 13 तक्रारीपैकी 9 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. त्यामध्ये 9 जणांचे 4 लाख 7 हजार 565 रूपयांचे बिल कमी करून देण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांच्या वाढीव बिलातील आतापर्यंत सुमारे 25 लाख 69 रुपये कमी करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पुढाकार घेतला आहे. अव्वाच्या सव्वा दराने बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना हा मोठा झटका मानला जात आहे. पुणे महापालिकेतर्फे नियुक्त केलेल्या ‘थर्ड पार्टी ऑडिटर’च्या टीमने ही धडक कारवाई केली आहे.

गुरूवारी एका दिवसात दाखल झालेल्या 13 तक्रारीपैकी 9 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. त्यामध्ये 9 जणांचे 4 लाख 7 हजार 565 रूपयांचे बिल कमी करून देण्यात आले आहे. दीड लाखांपेक्षा जास्त बिल आकारण्यात आले आहे, अशा बिलांची ऑडिटरकडून तपासणी केली जात आहे.

दि. 20 ऑगस्टपर्यंत दाखल झालेल्या एकूण 68 तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे. 48 तक्रारींमध्ये 1 कोटी 71 लाख 59 हजार 136 रूपयांच्या मूळ बिलांच्या रकमेत, महापालिकेच्या ऑडिटरकडून करण्यात आलेल्या तपासणीअंती 25 लाख 69 हजार 509 रूपये कमी करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील 25 मोठ्या खासगी हॉस्पिटलकरिता प्रत्येकी दोन ऑडिटरची नेमणूक महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. तर, दीड लाखापेक्षा अधिकचे बिल आकारले आहे,त्या रूग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी बिलाची झेरॉक्स आणि तक्रार अर्ज 8767858310 या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावा. दूरध्वनी क्रमांक 020-255502115 वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.