Pune News : कोरोनाबाधित राजू शेट्टी यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु

प्रकृती उत्तम असल्याची माहिती शेट्टी यांनी स्वतःच फेसबुकवर दिली आहे.

एमपीसी न्यूज – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकृती उत्तम असल्याची माहिती शेट्टी यांनी स्वतःच फेसबुकवर दिली आहे.

राजू शेट्टी यांनी मागील महिन्यात दुधाला भाव मिळावा म्हणून जोरदार आंदोलने केली आहेत. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.

राज्यात आंदोलन सुरू असतानाच शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली. शेट्टी यांचा अहवाल पाच दिवसापूर्वी सकारात्मक आला. ते घरीच विलागीकरण होऊन वैद्यकीय उपचार घेत होते.

मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठा असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे त्यांच्यावर ते कोरोनामुक्त होईपर्यंत उपचार केले जाणार आहेत. इतर कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे.

दि. 1 सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती. पण, 8 सप्टेंबरला ती पॉझिटिव्ह आली. हॉस्पिटलमध्ये बेड अडवून ठेवू नये म्हणून शेट्टी यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत होते.

दि. 9 सप्टेंबरला शेट्टी यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राजू शेट्टी यांची पत्नी आणि मुलगा सौरभ या दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सुरुवातीला सगळे घरीच क्वारंटाइन झाले होते. सध्या राजू शेट्टी यांची प्रकृती बरी आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.