Pune News : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही; आयुक्त

एमपीसी न्यूज – पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून कोरोनाला रोखण्यासाठी पुणे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. तर शहरात दैनंदिन कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, परंतु कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही, असे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी म्हटले आहे.

महापालिका भवन येथे गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयुक्त डॉ. विक्रम कुमार बोलत होते.

विक्रम कुमार म्हणाले, शहरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. या या अंतर्गत बावधन येथील इएसआय रुग्णालय ताब्यात घेणार असून 130 बेड्स कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येणार आहे. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील पाच दिवसांत 50 व्हेंटिलेटर वाढवणार आहोत. आता एकूण 400 ऑक्सिजन बेड शिल्लक असून आणखी 350 बेड्स पुढील 3 ते 4 दिवसात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

शहरातील आणखी 6 खासगी रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करू, पण कुठल्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी जास्तीत जास्त हॉस्पिटल ताब्यात घेतले जातील. सध्या शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात 800 पैकी 600 बेड्स कार्यरत आहेत. तसेच 50 ऑक्सिजन व 30 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.

साध्यस्तिथीला शहरात महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे एकूण 25 हजार डोस शिल्लक आहेत तर खासगी रुग्णालयांकडे 45 हजार डोस शिल्लक आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण 125 केंद्र सुरू आहे. दररोज 20 ते 22 हजार लोकांना लसींचा डोस दिला जात आहे. मागील 30 दिवसांत 5 लाख लोकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती विक्रम कुमार यांनी यावेळी दिली. होम आयसोलेशन रुग्णांनी घरी जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे हि त्यांनी सांगितले.

रेमीडिसिव्हरचा तुटवडा भासणार नाही
शहरात गुरुवारी 2000 तर दोन दिवसांत आणखी जास्त रेमीडिसिव्हर औषधांचा साठा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे रेमीडिसिव्हरचा निर्माण झालेला तुटवडा भासणार नाही. महापालिकेचे कॉलसेंटरकडे खासगी संस्थेकडे चालवायला देण्यात येणार आहे. दररोज 500 फोन येत असून 15 हेल्पलाईन कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.