Pune News: इ-वेस्ट कचरा संकलनात कोट्यावधीचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप

 एमपीसी न्यूज: शहरात 2015 पासून सुरू केलेल्या इ-वेस्ट व प्लॅस्टिक कचरा संकलन प्रक्रीयेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते हेमंत संभूस यांनी केला आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कचरा संकलन करणार्‍या संस्था संगणमताने हा भ्रष्टाचार करत असून संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी संभूस यांनी केली आहे.

इ-वेस्ट व प्लॅस्टिक कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेने स्वच्छ संस्था, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, जनवाणी या संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्था शहरातील कचरा संकलीत करून तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) मान्यता दिलेल्या विघटन केंद्राला पाठवून विल्हेवाट लावतात.

मात्र माहिती अधिकारात महापालिका व एमपीसीबीकडून माहिती मागविल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा आरोप संभूस यांनी केला आहे. महापालिकेच्या यादीत स्वच्छ संस्थेचे नाव आहे, मात्र नागरिकांना आवाहन केलेल्या पत्रकात स्वच्छचे नाव नाही, शहरात पर्यावरणाशी निगडित 250 संस्था असताना निविदा प्रक्रीया न राबवता 3 संस्थांना काम दिले. संकलित केलेला कचरा हडपसर येथील महालक्ष्मी रिसायकल्स यांच्याकडे पाढविला जातो. मात्र ही संस्था कोल्हापूरची आहे, ती एमपीसीबीच्या यादीत नाही. तसेच या संस्थेकडे कचर्‍याचे विघटन करण्यासाठी फर्नेसेसची यंत्रणा नाही. सन 2018 ते 2020 या दरम्यान दरवर्षी जवळपास 150 टन कचरा परस्परपणे बेंगलोर येथील सेरेब्रा अंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीसला पाठवला होता, मात्र पालिकेकडे याची कसलीच नोंद नाही, त्यामुळे यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संभूस यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.