Pune News : मराठवाडा कॉलेजमधील कोविड सेंटर बंद करू नये : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – कर्वेनगर येथील मराठवाडा कॉलेजमधील पुणे महापालिकेचे कोविड सेंटर बंद करू नये, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

या कोविड सेंटरमध्ये सध्या 225 ते 250 रुग्ण प्राथमिक उपचार घेत आहेत. वारजे – कर्वेनगर, कोथरुड, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या गावातील कोरोना रुग्णांसाठी हे सेंटर अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे कोविड सेंटर बंद करू नये, अशी विनंती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना करण्यात आली आहे.

छोटे छोटे कोविड सेंटर बंद करून मोठ्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण हलविण्याचे नियोजन सुरू आहे. हे कोविड सेंटर बंद करून वडगांव, औंध, बाणेर येथे रुग्ण हलविणार असल्याची माहिती रुग्णांना डॉक्टर देत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारे कोविड सेंटर बंद करून रुग्ण इतरत्र हलविणे चुकीचे आहे.

अद्यापही या भागातील कोरोनाचे संकट काही कमी झाले नाही. टेस्टिंग वाढल्याने कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. 5 ते 6 महिन्यापासून कर्वेनगर येथील कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचा परिसरातील रुग्णांना चांगला लाभ होत आहे. हे कोविड सेंटर बंद झाले तर या भागातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.