Pune News : महापौर निधीतून बाणेरमध्ये उभे राहणार कोविड हॉस्पिटल !

212 बेड्सचे अद्ययावत कोविड हॉस्पिटल; 04 ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टसह लिक्विड ऑक्सिजन टॅंकचीही होणार उभारणी

एमपीसी न्यूज – शहरामधील वाढती कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास महापालिका सक्षम असून पहिल्या कोरोना लाटेप्रमाणेच दुसऱ्या कोरोना लाटेवरदेखील नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महापालिका उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे महानगरपालिका बाणेर येथे आणखी एक कोविड हॉस्पिटल साकारत आहे, यासाठी महापौर निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

बाणेर येथील सर्व्हे क्र. 33 येथे पुणे महापालिकेच्या मान्य विकास आराखड्यात सी2-2 हे वाणिज्य वापराचे आणि पार्किंग हे आरक्षण असलेल्या महापालिकेच्या ताब्यात आलेल्या जागेत 212 बेड्सचे कोविड रुग्णालय साकारत असून याचा आढावा महापौर मोहोळ यांनी पदाधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांसमवेत घेतला. त्यानंतर ते बोलत होते.

या कोविड रुग्णालयात 150 ऑक्सिजन बेड्स आणि 62 आयसीयू बेड्स असणार आहेत. कमीत कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु केले जाणार आहे. या पाहणी वेळी आयुक्त विक्रम कुमार,सभागृहनेते गणेशजी बिडकर, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, बाबुराव चांदेरे, प्रल्हाद सायकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे हेही यावेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘दुसऱ्या लाटेच्या काळात स्वाभाविकपणे कोरोना रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने व्यवस्था व व्यवस्थापन वाढवण्याची जबाबदारी महापालिका कार्यतत्परतेने पार पाडत आहे. पहिल्या लाटेचा सामना करण्यासाठी बाणेर भागात अद्ययावत कोविड रुग्णालय महापालिकेने सुरू केले होते. एक वर्ष अत्यंत चांगली सुविधा व उपचार या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना देण्यात येत आहेत. महापालिकेचे हे एक मोठे यश असून समाधानाची बाब देखील आहे. त्याच धर्तीवर बाणेरमध्ये सर्व्हे क्र. 33 येथे आता दुसरे कोविड हॉस्पिटल महापालिका उभारत आहे.

बाणेर येथील दुसरे कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असून लवकरच अद्ययावत 262 बेडचे हॉस्पिटल बाणेर भागामध्ये उभारले जाणार जाईल. हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक तो सर्व निधी महापालिकेने तरतूद केला असून महापौर निधीतून निधी देण्यात आला आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.

बाणेरमध्ये ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार : महापौर
बाणेरमध्ये साकारत असलेल्या दुसऱ्या कोविड रुग्णालयात 1 हजार एलपीएम या क्षमतेचे चार ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिवाय या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन टॅंकचीही उभारणी केली जात आहे, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली. तसेच वातानुकूलित इमारतीसह सीसीटीव्हीदेखील यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.