Pune News : पुण्यात रोजचा कोरोना कचरा 8 हजार किलोपेक्षा जास्त, कशी लावली जातेय विल्हेवाट

एमपीसी न्यूज – शहरात गेल्या महिनाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनारुग्णांचा वैद्यकीय कचरा प्रतिदिन सहा ते आठ हजार किलोवर पोहोचला आहे. हा जैविक कचरा इन्सिनरेटरमध्ये जाळला जात आहे. इतर जैववैद्यकीय कचरा धरून रोज शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आता अकरा ते बारा हजार किलो झाले आहे.

पालिकेने एका कंपनीसोबत करार केलेला असून या कंपनीच्या इन्सिनरेटरमध्ये हा कचरा जाळून नष्ट केला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. शहरात सद्यस्थितीत जवळपास 53 हजार रुग्ण गृह विलगिकरणात आणि प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांवरील उपचारांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यासह पीपीई किट्स, जेवणाची ताटे व अन्य साहित्य असा सहा ते आठ टन कचरा दिवसाकाठी निर्माण होत आहे.

डॉ. नायडू रुग्णालयाजवळील कैलास स्मशानभूमीजवळ असलेल्या या कंपनीवर सध्या वाढलेल्या जैविक कचऱ्यामुळे ताण वाढला आहे. आवश्यकता भासल्यास तळोजा येथे कोरोनाचा कचरा पाठविला जातो. हा कचरा पाठविण्याकरिता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली आहे. शहरातील प्रकल्पाची क्षमता चार हजार किलो कचऱ्याची आहे. त्याची पूर्णत: सुरक्षितपणे आणि वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात रोज निघणारा कचरा – 2100 मेट्रिक टन
ओला कचरा – 900 मेट्रिक टन
सुका कचरा – 1200 मेट्रिक टॅन
रूग्णालयांमधून निर्माण होणारा कचरा – 14 मेट्रिक टन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.