Pune News : ‘लॅाकडाऊन’ बाबत येत्या आठ ते दहा दिवसांत निर्णय – अजित पवार

एमपीसी न्यूज – अलिकडच्या काही दिवसांत रस्त्यांवर प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. शहरात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून टाळेबंदीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि.22) दिली.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमदेवार जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मेळावा झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पवार म्हणाले, दिवाळीच्या कालावधीत रस्त्यावर बरीच गर्दी दिसून आली. गर्दी एवढी वाढली की कोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय, असे वाटण्याची परिस्थिती होती. एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही, हे मनातून काढून टाकले पाहिजे. त्यामुळे नियमांचे पालन करून वैयक्तिक काळजी घ्यावी लागणार आहे.

त्यामुळे संबंधित विभागांशी चर्चा करण्यात येत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुढील आठ ते दहा दिवसांत परिस्थितीचा विचार करून टाळेबंदीचा योग्य तो निर्णय घेतला जाईल. टाळेबंदीचा निर्णय आत्ताच घेतला तर नागरिकांमध्ये घबराट पसरेल असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.