Pune News : कर सवलतीमुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नात घट

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील 5 ते 6 महिन्यांपासून कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. स्थायी समितीने येत्या 31 मार्चपर्यंत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पुढील वर्षाच्या मिळकतकरात 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.  ही योजना पुढील वर्षाच्या 30 सप्टेंबरपर्यंत असली तरी त्यामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते, असे कर आकारणी आणि कर संकलन विभागाने प्रस्तावात म्हटले आहे.

तर, अभय योजना राबविण्यास हरकत नसल्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यावर विधी विभागाचा अभिप्राय घेण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मिळकतकराच्या शास्तीच्या दोन टक्के दंडाच्या रकमेवर 80  टक्के सूट देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यामुळे कर आकारणी आणि कर संकलन विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो विधी विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविला आहे.

येत्या 31  मार्चपर्यंत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पुढील वर्षाच्या मिळकतकरात 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, त्याला कर आकारणी आणि कर संकलन विभागाने विरोध दर्शविला आहे.

स्थायी समितीने 50  लाख आणि त्यापेक्षा कमी मिळकतकरांची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी 2 ऑक्टोबर ते 30  नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास त्यांना दोन टक्के शास्तीच्या रकमेत 80 टक्के सवलत देण्याचा निर्णय सर्वपक्षीयांनी घेतला आहे.

या प्रस्तावावर आयुक्तांची सही झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या ‘स’ यादीलाही कात्री लावण्यात आली आहे. केवळ 40 टक्के निधीच नगरसेवकांना मिळणार आहे.

त्यामुळे मोठे प्रोजेक्ट यावर्षीही तसेच राहणार आहे. कमी निधीत कोणती कामे करावी, असा प्रश्न सर्वोपक्षीय नगरसेवकांना निर्माण झाला आहे.

पुणे महापालिकेचे बजेट हे 7 हजार कोटींच्या आसपास आहे. यावर्षी कोरोनामुळे विविध समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सध्या महापालिकेतर्फे केवळ आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.