Pune News : दीपक मारटकर खून; कामात कुचराई करणाऱ्या 6 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

आरोपींनी ससून रुग्णाल्यात घेतली होती कुख्यात बापू नायरची भेट

एमपीसी न्यूज : पुण्यातील युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. ससूनमध्ये ॲडमिट असलेल्या कुख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पुणे पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांना कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी रात्री निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणात कोर्ट कंपनीमधील एक हवालदार आणि 5 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. कॉन्स्टेबल 2016 बॅचचे असून हवालदार हा रेल्वे पोलीस दलातून पुणे शहर पोलीस दलात बदलून आला आहे.

युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर याचा 10 जणांनी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला होता. त्यानंतर काही दिवसांत पुणे पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर कुख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून केल्याचे समोर आले होते.

या खुनातील आरोपी हे बापू नायर याला ससून रुग्णालयात भेटल्याचे समोर आले होते. बापू नायर सध्या कारागृहात आहे. उपचारासाठी तो ससून रुग्णालयात आला होता. त्यावेळी या आरोपींनी त्याची भेट घेतली होती. त्यावेळी हा खुनाचा कट रचून त्यानंतर हत्या करण्यात आली.

दरम्यान, बापू नायरला कोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. दोन ते तीन दिवस हा बंदोबस्त होता. परंतु पोलिसांचा बंदोबस्त असताना आरोपी नायरला कसे भेटले, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला. अधिकार्‍यांनी त्याची चौकशी केली. त्यात हे सर्वजण त्या कालावधीत ड्युटीवर असल्याचे समोर आले.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामात कुचराई करत त्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.