Pune News : लोकप्रतिनिधींच्या चमकोगिरीमुळे महापालिका आवाराचे विद्रुपीकरण !

एमपीसी न्यूज : भामा आसखेड पाणीपुवठा प्रकल्पाच्या श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी लोकप्रतिनिधींमध्ये जुंपली. त्यापार्श्वभुमीवर लोकार्पण कार्यक्रमानिमित्ताने पुणे महापालिका प्रवेशद्वारासमोर लोकप्रतिनिधींच्या चमकोगिरीसाठी फ्लेक्स लावल्यामुळे महापालिका आवाराचे विद्रुपीकरण झाले.

एकीकडे महापालिका प्रशासन अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई करत आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींविरोधात कारवाईसाठी डोळेझाक करत मुग गिळून गप्प बसल्याचे दिसून आले.

पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भलेमोठे फ्लेक्स लावत लोकप्रतिनिधींनी पालिकेचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले. सर्वसामान्य नागरिकांना सर्व नियम, निर्बंध लागू आणि लोकप्रतिनिधींना मात्र नियम तोडले तरी ‘आळी मिळी गुपचिळी’ असा भोंगळ कारभार सुरु असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले.

या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागप्रमुख व महापालिका आयुक्तांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.