Pune News : भामा आसखेडचं पाणी हडपसर वानवडीला वळविण्याची मागणी !

एमपीसी न्यूज : भामा आसखेड योजनेच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांना भिडले असताना आता पाणी वाटपावरून रणकंदन माजलं आहे. लष्कर जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर तो आता हडपसर वानवडी भागाला भामा आसखेडचे वळविण्याचा आग्रह महापालिकेतील सत्ताधारी भाजपने धरला आहे.

वडगांवशेरी भागाला सोडले जाणारे रोजचे 200 एमएलडी हडपसरला हवे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसे झाल्यास संपूर्ण पूर्व भागांत पुरेसे पाणी मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पूर्व भागातील रहिवाशांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. मात्र, लष्कर जलकेंद्रातील पूर्व भागाच्या वाट्याचे पाणी अन्य परिसरांना दिल्यास आंदोलनाची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

नगर रस्त्यावरील काही भागांतील रहिवाशांना रोज पुरेशा प्रमाणात पाणी देण्यासाठी आखलेल्या भामा आसखेड योजनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या धरणातून पाणीपुरवठा होणार असून, त्याच्या अंतिम चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही काही दिवसांत योजनेतून पाणीपुरवठा होईल. त्यानंतर लष्कर जलकेंद्रातून या भागांना होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे.

सध्या पूर्व भागासाठी खडकवासल्यातून लष्कर जलकेंद्रात सुमारे चारशे एमएलडी पाणी घेतले जाते. त्यातील दोनशे एमएलडी पाणी भामा आसखेडमधून उचलले जाईल. त्यामुळे लष्कर केंद्रातील पाणी अन्य भागाला पुरविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्याआधी या केंद्रातून पाणी पूर्व भागाला मिळाले पाहिजे, असे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे.

त्या संदर्भात नगरसेविका पुंडे म्हणाल्या, लष्कर जलकेंद्रातून येरवडा, वडगावशेरी, खराडी चंदननगरसह, हडपसर, वानवडी आणि परिसरांना पाणीपुरवठा करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू झाल्यास निम्मा पाणीसाठा हडपसर, वानवडीसाठी वापरावा.

दरम्यान लष्कर जलकेंद्रातून नियोजित भागांना सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र, जेव्हा, भामा आसखेड प्रकल्प सुरू होईल; लष्कर केंद्रासाठी कमी पाणी घेतले जाईल. ज्यामुळे सध्याच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करणे शक्‍य होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.