Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या नियमांचे परिपत्रक काढा – संदीप खर्डेकर

कोथरूड नवरात्र महोत्सवाच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी

एमपीसी न्यूज – घटस्थापनेस अवघे 27 दिवस राहिले असताना आणि कोरोना संसर्गात वाढ होत असताना स्वाभाविकच गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्राच्या काळातही सण साजरा करण्यावर बंधन येणार हे स्पष्ट आहे. मात्र, त्यासंदर्भातील नियमावली त्वरित तयार करावी, अशी मागणी कोथरूड नवरात्र महोत्सव संस्थापक अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

सालाबादप्रमाणे आम्हाला आमच्या देवीची मूर्ती रंगविण्यापासून मूर्ती घडविण्यापर्यंतचे सर्व कार्य आत्तापासूनच करावयाचे असते. तसेच गणेशोत्सव मंडळांप्रमाणे बऱ्याच नवरात्र मंडळांचे मंदिर नसते – बंगाली व गुजराती बांधव ही या काळात मोठ्या प्रमाणावर नवरात्र साजरी करत असतात.

या कालावधीत मांडव घालणे, मूर्तीची प्रतिष्ठापना, विसर्जन व स्वागत मिरवणूक, यज्ञ, दैनंदिन पूजा आरती, गरबा व सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मंदिरात होणारे कार्यक्रम या सगळ्या बाबतीत स्पष्ट आदेश व मार्गदर्शन अपेक्षित आहे.

शासकीय पातळीवर विचार विनिमय करुन त्वरित परिपत्रक काढावे. कोरोनाच्या संकटकाळी आम्ही नियमांनुसार आणि सामान्य पुणेकरांना त्रास होणार नाही अश्याच पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यास कटिबद्ध आहोत, असेही संदीप खर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.