Pune News : पुणे ग्रामीण भागातील हॉटेल, बार मधून जेवणासह मद्य पार्सल सुविधा सुुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रेस्टॉरंट व बार मधून जेवणासह मद्य पार्सल देण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी. तसेच हॉटेल व्यवसायाला उभारी देण्यासाठी अन्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा (ग्रामीण) हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

असोसिएशनकडून पुणे जिखाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी स्वीकारले.

असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब दाते म्हणाले, लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यातील रेस्टॉरंट व बार मागील वर्षभर बंद आहेत. कोरोना महामारी राज्यात नियंत्रणात राहण्यासाठी आम्ही लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद ठेवले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व एसईझेड, एमआयडीसी आणि औद्योगीक विभागातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत. त्यामुळे औद्योगीक विभागातील कामगार व अधिकारी व तेथे येणाऱ्या मालवाहतूक कर्मचाऱ्यांची सोय होईल.

लॉकडाऊन काळात हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक संकटांना कंटाळून काही हॉटेल व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने हॉटेल व्यावसायिकांना एक वर्षाची नूतनीकरण फी, विक्री कर आणि लाईट बिल माफ करावेत. तसेच हॉटेल व्यावसायीकांना आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी दाते यांनी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्काची मिशन ऑलआऊट योजना प्रभावीपणे राबवून अवैध मद्य विक्री, मद्यवाहतूक, हातभट्टी, बनावट देशी – विदेशी मद्य निर्मिती या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे. वाईन शॉप मधून अवैध हॉटेल आणि धंद्यांना मद्य साठा मिळत असल्यामुळे अवैध धंदे फोफावले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका तसेच वाशिम जिल्हाधिकारी यांनी एक जून पासून ग्रामीण भागातील रेस्टॉरंट व बार मधून होम डिलिव्हरी, पार्सल देण्याची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे पुणे ग्रामीण परिसरातील रेस्टॉरंट व बार मधून दुपारी दोन वाजेपर्यंत मद्य व जेवणाची पार्सल सुविधा सुरु करण्याची देखील मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे (एसओपी) आम्ही प्रामाणिकपणे पालन करून शासनाला संपूर्ण सहकार्य करू. असे आश्वासन अध्यक्ष दाते यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.