Pune News: बांधकाम व्यावसायिकाला 35 लाखाची खंडणी मागितली, फुटबॉल प्रशिक्षकासह सहा जणांना बेड्या

अंबाजी शिंगे याने फिर्यादी यांना संपर्क साधून मावळातील एका व्यक्तीने तुम्हाला जिवे मारण्यासाठी सव्वा कोटीची सुपारी घेतल्याचे सांगितले.

एमपीसी न्यूज- मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला 35 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी फुटबॉल प्रशिक्षकासह सहा जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.

अंबाजी कल्याणी शिंगे (वय 21), नितीन येडबा गायकवाड (38), रोशन तुकाराम आंद्रे (27), प्रकाश सिदप्पा बजंत्री (21), विकास रघुनाथ आंद्रे (38) आणि सागर शांताराम आंद्रे (26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी अंबाजी शिंगे हा फुटबॉल प्रशिक्षक आहे. याप्रकरणी महेश हणमंत भद्रावती (49) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी संगनमत करून फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अंबाजी शिंगे याने फिर्यादी यांना संपर्क साधून मावळातील एका व्यक्तीने तुम्हाला जिवे मारण्यासाठी सव्वा कोटीची सुपारी घेतल्याचे सांगितले. मी मध्यस्थी करून प्रकरण मिटवून घेतो. त्यासाठी तुम्हाला 35 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

दरम्यान, या सर्व घटनेनंतर फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस ठाणे गाठत याची पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात शिंगे हाच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.