Pune News : कचरा न उचलणाऱ्या फटाका स्टॉलधारकांची अनामत रक्कम जप्त !

एमपीसी न्यूज : दिवाळीमध्ये लावण्यात आलेल्या फटाका स्टॉल मालकांनी दिवाळीनंतर कचरा न उचलल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशा स्टॉलधारकांची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे.याबाबतचे निर्देश अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

दिवाळीनिमित्त शहरात सर्वत्र फटाक्यांचे स्टॉल लावले जातात. या स्टॉलसाठी महापालिकेकडून रीतसर परवानगी दिली जाते. अनामत रक्कम भरुन तसेच भाडे आकारणी करुन मांडव घालण्यास परवानगी दिली जाते.

नदी पात्रासह शहराच्या विविध भागात लागणाऱ्या या स्टॉलवर बॉक्स आणि कागदांचा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो. हा कचरा त्यांनी हटविणे, त्याची विल्हेवाट लावणे तसेच पालिकेच्या यंत्रणेकडे देणे आवश्यक आहे. परंतू, स्टॉलधारक याकडे दुर्लक्ष करतात.

दिवाळीदरम्यान परवानगी देण्यात आलेल्या बहुतांश फटाका स्टॉलखाली मोठ्या प्रमाणावर कचरा साठल्याचे निदर्शनास आले आहे. हे स्टॉल लावणाऱ्या व्यक्तीही निघून गेल्या आहेत.

अशा स्टॉलधारकांची यादी करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांनी महापालिकेकडे भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. याबाबतच्या कारवाई संदर्भात सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.