Pune News : पुण्यातील महिला पोलीस उपायुक्तांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – पोलीस दलात काम करताना अचानक उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना न डगमगता करणा-या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी असेच चांगले काम करुन पोलीस विभागाचे नाव उज्ज्वल करावे, अशी आशा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

माहेर महिला प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्त्याने पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माहेर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे उपस्थित होत्या.

पवार यांनी प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन केले व ते पुढे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या विचारावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. त्याबाबतचा दृढ संकल्प केला आहे. प्रगत, संपन्न, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचे काम स्व. चव्हाण यांनी केले असे सांगून स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला.

पोलीस खात्यासमोर अचानक समस्या उभ्या राहतात. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत पोलीस विभागाची विशेष जबाबदारी आहे. कोरोना वाढतोय त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे सांगून सर्व घटकाला, नागरिकांना लसीकरण कसे करता येईल याचे नियोजन करत असल्याबाबत त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी जाहीर केलेल्या सवलती, योजनांबाबत माहिती देऊन कोरोनासारख्या अडचणीच्या काळातही अर्थसंकल्पामध्ये चांगले निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

एमपीएससीच्या परीक्षा देऊन विद्यार्थी पोलीस, महसूल यासारख्या विविध विभागात काम करतील. काही दिवसातच परीक्षा घेतली जाईल असे सांगितले होते, त्यानुसार परीक्षेच्या तारखाही आता जाहीर झाल्या आहेत. परीक्षेबाबत झालेल्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अभ्यासावर लक्ष द्यावे, स्वत:ची काळजी घ्यावी, यश संपादन करावे, जे क्षेत्र निवडतील त्यात मनापासून उत्तम काम करावे, असा सल्लाही एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.