Pune News : पुणे महापालिकेतील उपअभियंत्याला पन्नास हजारांची लाच घेताना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाच प्रकरण ताजे असतानाच आता तसाच प्रकार पुणे महापालिकेतही घडला आहे. रस्ते विभागातील बिले काढण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागितल्याप्रकरणी उपअभियंता सुधीर सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. टिंगरेनगर येथे ही कारवाई करण्यात आली.

या विषयी 39 वर्षीय बांधकाम कंत्राटदाराने तक्रार दिली होती. पुणे महापालिकेच्या रस्ते विभागातील उपअभियंता सुधीर विठ्ठलराव सोनवणे (वय 51) यांनी संबंधित तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 40 हजार रुपयांची लाच स्विकारताना सोनवणे यांना अटक करण्यात आली.

तक्रारदार हे व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार आहेत. त्यांचे सन 2018/19 मध्ये केलेल्या शाळेच्या दुरुस्तीचे एकूण 19 लाख रुपयाचे बिल पास झाले नाही. त्यामुळे ते उपअभियंता सोनवणे यांना भेटले. त्या वेळी त्यांनी मंजुरीसाठी तसेच यापूर्वी बिल मंजूर केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे टक्केवारी म्हणून 50 हजार रुपयांच्या लाच मागितली होती. कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सोमवारी (दि. 23) सापळा रचून 40 हजार रुपयांची लाच स्विकारताना सोनवणे यांना पकडले.

लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक, राजेश बनसोडे, विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, शरद गोर्डे, तसेच भूषण ठाकूर, पूजा पगिरे आदींनी कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.