Pune News : नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड

एमपीसी न्यूज – नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी व माझे पोलीस दल कटिबद्ध असून सर्व घटकांच्या सहभागाने नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवू, असे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने प्रभाग १३ एरंडवणा हॅपी कॉलनी येथील विविध सोसायट्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या समवेत नागरिकांच्या प्रत्यक्ष संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

मी एकदा कारवाई सुरु केल्यावर मात्र कोणी नरम धोरण घेऊ नका, असेही त्यांनी नर्मविनोदी शैलीत सुनावले.

गिरीजाशंकर विहार, पोतनीस परिसर, सहवास सोसायटी, आसावरी, विभावरी, याद अपार्टमेंट, हॅपी कॉलनी, पश्चिमानगरी व म्हात्रे पूल ते राजाराम पूल (डी, पी, रस्ता) येथील पदाधिकारी व नागरिकांनी आपल्या समस्या तीव्रतेने मांडल्या.

सर्व विषय समजून घेऊन, त्याची नोंद घेऊन त्यांनी जागेवरच वाहतूक पोलिस निरीक्षक सायकर व दामिनी पथकाच्या लांडे यांना बोलावून घेतले. आणि त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या या कार्यतत्परतेने आम्ही भारावून गेलो असून अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न नक्की सुटतील, असा विश्वास नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला. तसेच कारवाईस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन ही दिले.

नगरसेवक दीपक पोटे यांनी गैरकृत्य करणाऱ्यांना जरब बसावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विषयात मनपा आरोग्य खाते व अतिक्रमण खात्याचे संपूर्ण सहकार्य राहील असेही स्पष्ट केले. यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. या सर्व विषयात त्वरित कारवाई केली जाईल. प्रसंगी दंडात्मक कारवाईचा परिणाम न झाल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिला.

यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर व भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी सोसायट्यांनी त्यांच्या आवारातील व्यवसायिकांसाठी आचारसंहिता तयार करावी. त्याचे पालन न करणाऱ्यांची रीतसर तक्रार दाखल करावी असे सुचविले. यावेळी कोथरूड मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी, प्रभाग १३ अध्यक्ष राजेंद्र येडे, अनुराधा एडके, सुवर्णा काकडे, माणिक दीक्षित, रुपालीमगर, जागृती कणेकर, केतन क्षीरसागर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.