Pune News : विकास हवाच आहे, पण परंपरा मोडून नको – आबा बागुल

एमपीसी न्यूज – विकास हवाच आहे. मात्र, आपल्या परंपरा मोडून नको, यासाठी महानगरपालिकेला पर्याय  दिला असल्याचे काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असणारी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दीर्घकाळ लक्ष्मीरोड, टिळक रोड, केळकर रोड, लाल बहादुर शास्त्री रोड अशा विविध ठिकाणाहून या मिरवणुका वाजत गाजत सजावटीसह लकडी पुलावरून जाणाऱ्या सर्व मिरावणुकांच्या उंचीचा प्रश्न मेट्रो पुलामुळे निर्माण झाला होता.

शहरात कोणत्याही परिस्थितीत मेट्रो हवीच आहे. मात्र, आपल्या पुण्याचे पुणेरीपण जपणारी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मोडीत काढू नये,  यासाठी नवा पर्याय पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी  आर्किटेक्ट आयआयटीयन्स अतुल राजवडे व सहकाऱ्यांच्या  मदतीने तयार केला आहे.

यामध्ये लकडी पुलावरून मेट्रो जात असल्यामुळे याठिकाणी मेट्रो पुलाची उंची साधारण 20 फूट इतकी असल्याने हा पूल सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण ठरत आहे. काउंटर वेट मकॅनिझम ऑफ वॉटर टॅंक या  तंत्रज्ञानामुळे सहज 40 फुटांपर्यंत उंची वाढवणे शक्य होईल व विसर्जन मिरवणूक झाल्यावर पूर्ववत करता येईल.

साधारण या पुलाचे वजन 100 टन असून 25 टनाचे 4 काउंटर वेट वॉटर टँकच्या मदतीने उचलण्यात येणार असून याकरिता स्टेनलेस स्टील गियर मकॅनिझमचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी साधारण 8 ते 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे तंत्रज्ञान संपूर्ण मेंटेनन्स फ्री असणार आहे.

या तंत्रज्ञानासाठी उभारण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरवर व्युव्हिंग गॅलरी व सोलर पॅनल तयार करून येणाऱ्या उत्पनांतून काही वर्षांत मेट्रो पुलाचा खर्च निघेल व कायम उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होईल. हे तंत्रज्ञान भारतातील पहिले असणार असून पुण्याच्या वैभवात भर पडणार आहे.

पूल उचल्याणसाठी 4 काउंटर वेट टाक्यांमध्ये पाणी भरल्यास पुलाची उंची 20 फूट वाढेल व पाणी सोडून दिल्यास पूर्ववत होईल. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका या पुलाखालून ट्रॅक्टर, ट्रॉली, देखावे 40 फुटांपर्यंत जरी गेले तरी  सहज निघून जाईल.

आर्किटेक्ट अतुल राजवडे व त्यांच्या टीमने  हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पुणे शहराच्या परंपरेला बाधा न येता मेट्रो प्रकल्प सुरू राहील. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पूर्ण होण्यास कोणतीही बाधा येणार नाही. यामुळे शहरातील विकासही होईल व पुण्याची परंपराही कायम राहील असे आबा बागुल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.