Pune News : तीन वेळेस मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवले – संजय काकडे

एमपीसी न्यूज – शरद पवार हे मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मराठा समाजासाठी काही तरी करतील या आशेवर आजवर निवडून दिले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. तीन वेळेस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिले आहे. परंतु मराठा आरक्षणाचा निर्णय त्यांना घेता आला नाही. परंतु देवेंद्र फडणीस यांनी मात्र सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण देखील या सरकारला टिकवता आले नाही असे सांगत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार संजय काकडे यांची नियुक्ती केली आहे. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

संजय काकडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महत्प्रयासाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते. परंतु या सरकारला कोर्टामध्ये नीट बाजू मांडता आली नाही ही त्यामुळे हे आरक्षण टिकले नाही. राज्य सरकारने यापुढे राजकारण न करता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ते काय करणार आहेत हे स्पष्ट करावे.

राज्य सरकारच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही
राज्यात कोरोनाची परिस्थिती भयावह होत असताना सरकारच्या मंत्र्यांमध्ये ताळमिळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या घोषणा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातून बाहेर पडावे आणि लोकांमध्ये फिरावे. तेव्हाच त्यांना राज्यातील खऱ्या परिस्थितीचा अंदाज येईल. प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारला जबाबदार धरता मग राज्य सरकारची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.