Pune News : देवेंद्र फडणवीस घेणार पुणे महापालिकेत आढावा बैठक !

एमपीसी न्यूज : भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरूवारी विविध विषयांवर आढावा बैठका घेणार आहेत.

पुणे महापालिका भवनात महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांसोबत शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व नगरसेवकांशी देखील संवाद साधणार आहेत. काही दिवसांपुर्वी मीरा भाईंदर येथील केशव सृष्टी स्व.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पार पडलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले होते. दरम्यान नवी दिल्ली येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महविद्यालयाच्या उभारणी संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, जायका जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी भेटी घेत फडणवीस यांनी पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, पुणे मेट्रो इत्यादी रखडलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा देखील त्यांनी वेळोवेळी केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे लोकसभा मतदारसंघात खासदार गिरीष बापट, कोथरूडचे आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कसबा विधानसभा मतदरसंघाच्या आमदार मुक्ता टिळक, पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ, पुणे कँटोन्मेंट विधानसभेचे आमदार सुनिल कांबळे आणि खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर तसेच पुणे महापालिकेत 98 नगरसेवकांचं संख्याबळ असताना देखील पुणे शहरात दृश्य स्वरुपात प्रकल्प, विकासकामे दिसून येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांकडून केला जात असतो.

तसेच आगामी महापालिका निवडणुका दोन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार असल्यामुळे पक्षांतर केलेल्या नगरसेवकांची ‘पुन्हा मूळ पक्षात घरवापसी’ होण्याची दाट शक्यता आहे. त्यात कोरोना महामारीमुळे शून्य निधी मिळाल्यामुळे नाराजीत भर पडली आहे. उपमहापौर पदावरून मित्रपक्ष रिपाइं नगरसेवकांमध्ये दिलेला शब्द पाळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी आहे. एक वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर फडणवीस पुणे महापालिकेत आढावा बैठका घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.